अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट “लक्ष्मी बॉम्ब’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी केले आहे. या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत अभिनेता तरुण अरोरा दिसणार असल्याची माहिती एका ईन्टरटेन्मेन्ट मासिकाने दिली आहे. तरुणने 2007 साली प्रदर्शित झालेल्या “जब वी मेट’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याने करीनाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट तमिळ कॉमेडी भयपट “कंचना’चा रिमेक आहे. रिमेकप्रमाणे या चित्रपटातही व्हिलन एक भ्रष्ट आमदार असणार आहे. यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या “कंचना 3′ मध्ये तरुणने दिग्दर्शक राघव यांच्यासोबत काम केले होते.
या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. या चित्रपटात अक्षयसह अभिनेते अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून 5 जून 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल महिन्यातच सुरु झाले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.