पुणे – हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. देशाच्या विविध भागामध्ये “आखिती’,”आखातरी’ देखील म्हणतात. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे.
गुढीपाडवा, बलिप्रतिपदा(पाडवा), दसरा आणि अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्त आहेत. नवीन वर्षातील हा दुसरा मोठा सण असतो. अक्षय तृतीयेचे औचित्य साधून नागरिक सोने-चांदी, वाहने, घर, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आदींची खरेदी करतात. या दिवशी अनेक शुभ कार्यांचा प्रारंभ केला जातो. अक्षय तृतीयेपासून लग्नसराईला सुरुवात होते.
यादिवशी “करा’ची (मातीचा माठ) पूजा करून, आमरसाचा नैवेद्य दाखवला जातो. यासह अक्षय तृतीयेला चैत्रात बसवलेल्या चैत्र गौरींचे विसर्जन करतात. यादिवशी कैरीची डाळ, पन्हे करण्यात येत असून, हळदीकुंकू केले जाते. अक्षय तृतीयेला नवा आंबा बाजारात दाखल होतो. या दिवशी दानधर्माला देखील महत्त्व आहे.
देशातील विविध प्रांतांमध्ये पूजाअर्चा, वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दक्षिणेकडे हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अक्षय, चिरकाल हव्या असणाऱ्या गोष्टी अक्षय तृतीयेला कराव्यात, अक्षय तृतीयेला केलेली खरेदी कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते.