मुंबई – Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेंचा सोमवारी (23 सप्टेंबर रोजी) मुंब्रा बायपासजवळ एन्काऊन्टरमध्ये मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असता स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये त्याच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याचा दावा सरकारी यंत्रणांकडून करण्यात आला आहे. मात्र अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या एन्काऊन्टरची सखोल चौकशी करण्याची मागणी करत याचिका दाखल केली असून या याचिकेवर आज पहिल्यांदा सुनावणी झाली. या सुनावणीवेळी हायकोर्टाने सरकारसह पोलिसांना चांगलेच खडसावले.
अक्षयला खोट्या आरोपात गोवण्यात आले असून त्याचा राजकीय बळी देण्यात आला आहे, असा आरोपही त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला होता. याप्रकरणी रिट पिटीशन / ४१०७/२०२४ अंतर्गत हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली. वकील अमित कटाकनवरे यांनी आरोपी अक्षय शिंदे यांच्या कुटुंबाची बाजू मांडली. तर सरकारी वकील हितेन वेणूगावकर यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली. न्यायमूर्ती रेवती मोहीती डेरे आणि चव्हाण यांच्या खंडपीठासमोर याबद्दलची सुनावणी पडली. यावेळी कोर्टाने प्रथमदर्शनी हा काही एन्काऊंटर वाटत नाही. पोलिसांवर संशय नाही पण याची योग्य चौकशी व्हायला हवी, असे न्यायमूर्तींनी म्हटले.
न्यायालयाकडून सरकारी वकिलांना अनेक प्रश्न –
याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारी वकिलांवर प्रश्नाचा भडीमार केल्याचं सुनावणीदरम्यान पाहायला मिळालं. न्यायालयाने पोलिसांची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांना अनेक प्रश्न विचारले. यामध्ये अगदी आरोपीला कधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं इथपासून ते पिस्तूल अनलॉक का होती इथपर्यंत प्रश्नांची सरबत्ती कोर्टाने लावली.
रुग्णालयात दाखल करण्याबद्दल सरकारी वकिलांनी काय सांगितलं?
याचिकेवर सुनावणी सुरु झाल्यानंतर पोलिसांची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांनी, “घटनेनंतर 25 मिनिटांमध्ये जखमींना कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले,” असं सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने आरोपीवर गुन्हा कधी दाखल झाला? त्याला रुग्णालयात कधी नेण्यात आलं? शवविच्छेदन केव्हा करण्यात आलं? यासंदर्भातील माहिती सरकारी वकिलांना विचारण्यात आली.
अक्षय शिंदे एन्काऊटर प्रकरणी कोर्टात उपस्थित केलेले 10 महत्त्वाचे मुद्दे –
– डोक्यात गोळी का मारली?
– पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर?
– पिस्तुल की रिव्हॉल्व्हरमधून गोळी मारली?
– आरोपीला काबू करायला हवं होतं, गोळी का मारली, 4 पोलीस एकाला काबू करु शकत नव्हते का?
– आरोपीने पिस्तुलचे लॉक ओपन करून राऊंड फायर केले का?
– पोलिसांची पिस्तुल अनलॉक का होती?
– सामान्य माणूस बंदुक चालवू शकत नाही
– याला एन्काऊंटर बोलू शकत नाही, एन्काऊंटरची व्याख्या वेगळी
– 3 गोळ्या मारल्या एक लागली, तर 2 गोळ्या कुठे?
– जप्त केलेलं हत्यार कुठे आहे?
– गोळी जवळून मारली गेली, शवविच्छेदन अहवाल बघून कोर्टानं निरीक्षण नोंदवलं
– फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील
पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला –
दरम्यान याप्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे देण्यात आला आहे. त्यांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. यावर कोर्टाने सीआयडीचा तपास कधी पूर्ण होणार याची माहिती द्या, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच सीसीटीव्ही, सखोल पंचनामा कॉपी, सीडीआर, सीलबंद फॉरेन्सिक अहवाल या सगळ्यांचे जबाब द्या, असेही आदेश कोर्टाने दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.