मुंबई – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने बुधवारी मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यादरम्यान दोघांनी उत्तर प्रदेशातील आगामी फिल्म सिटीबद्दल सखोल चर्चा केली. अक्षय कुमार आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईतील हॉटेल ताजमध्ये भेट झाली. जवळपास 35 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या भेटीदरम्यान अक्षय कुमारने त्यांच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचा उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांना चित्रपट पाहण्याची विनंती केली. तसेच, अक्षय कुमार म्हणाला की, हिंदी फिल्म इंडस्ट्री यूपी फिल्म सिटीची आतुरतेने वाट पाहत आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या यूपी फिल्म सिटी या बहुप्रतिक्षित प्रकल्पाबाबत अक्षय कुमार म्हणाला की यामुळे नवीन संधी उपलब्ध होतील.
बैठकीदरम्यान मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, ‘चित्रपट सामाजिक जागृती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यासोबतच सामाजिक व राष्ट्रीय कार्याचा प्रचारही त्यांच्या माध्यमातून केला जातो. योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्यांचे सरकार लवकरच नवीन चित्रपट धोरण आणणार आहे.’