मुंबई – बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या “रुस्तम’ चित्रपटामुळे अडचणीत सापडला आहे. अक्षय कुमारसह चित्रपटाशी संबंधित 6 जण आणि एका चित्रपटगृहा मालकाला न्यायालयाने नोटीस बजाविली आहे. मध्य प्रदेशमधील कटनी न्यायालयाने अक्षय कुमारविरोधात नोटीस जारी केली आहे.
याबाबत अक्षयला 10 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या चित्रपटातील एका डायलॉगवरून वाद उपस्थित झाला आहे. “रुस्तम’मधील एका सीनमध्ये न्यायाधीशाची भूमिका साकारत असलेला अभिनेता अनंग देसाई हे वकिलाला बेशर्म असे उद्देशून बोलतात.
याप्रकरणी कटनी येथील वकील मनोज गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये अक्षय कुमारसह सुभाष चंद्रा, मुरुदल केजार, टीनू सुरेश देसाई, विपुल रावल, अनंग देसाई आणि सुरेश गुप्ता यांची नावे आहेत. तसेच आरोपींना कठोर शिक्षा आणि दंड ठोठविण्याचीही मागणी केली आहे.
ऍड. मनोज गुप्ता यांनी 2016मध्येच चित्रपट रिलीज झालानंतर तक्रार दिली होती. परंतु यावर कोणतीही सुनावणी होवू शकली नाही. त्यानंतर थेट 2020मध्ये सुनावणी झाली. परंतु लॉकडाउन करण्यात आल्याने सुनावणी पुन्हा रखडली. आता न्यायालयाने चित्रपटाशी संबंधित सदस्यांना नोटीस बजाविली आहे.