बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून रोहित शेट्टीच्या “सूर्यवंशी’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत अक्षय कुमार कन्फर्म आहे. पण अद्याप यातील नायिका कोण याबाबत अनिश्चित होते. पण आता चित्रपटातील नायिका म्हणून कतरिना कैफचे नाव निश्चित करण्यात आले आहे. याबाबत खुद्द निर्माता करण जोहर याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
करण जोहरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी दिसत आहेत. यात कतरिनाने लाल रंगाचा फ्लोरल टॉप आणि डेनिममध्ये झळकते. हा फोटो शेअर करत करणने लिहिले की, “सूर्यवंशी’ गर्ल कतरिनाचे स्वागत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होईल. तर अक्षयने लिहिले की, आमच्या पोलिसांच्या जगतात कतरिनाचे स्वागत… आमची “सूर्यवंशी’ गर्ल.
दरम्यान, रोहितने “सिंघम’, “सिंघम रिटर्न’ आणि “सिंबा’ यासारखी सुपरहिट कॉप ड्राम चित्रपट साकारले आहेत. या चित्रपटात कतरिना काम करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. आता तिचे नाव निश्चित झाल्याने लवकरच अक्षय-कतरिना या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहेत. या जोडीला तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकत्रीत पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.