बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षयकुमार सध्या आपल्या आगामी “बेलबॉटम’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटचे शूटिंग स्कॉटलॅंड येथे सुरू आहे.
अक्षयकुमारसह चित्रपटाची संपूर्ण टीम आणि क्रू खासगी जेटने स्कॉटलॅंडला गेले होते. यानंतर सर्व जणांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आणि यानंतर शूटिंगला सुरुवात झाली.
अशात प्रोड्यूसरला अतिरिक्त भुर्दंड बसल्याने अक्षयकुमार याने आपला 18 वर्षे जुना नियम मोडला आहे. त्याचे असे की, गेल्या 18 वर्षांपासून अक्षयकुमार याने एक नियम कटाक्षाने पाळला होता.
तो म्हणजे, 8 तासांपेक्षा जास्त काम करायचे नाही. परंतु, त्याने आता शिफ्ट डबल करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयकुमारच्या या निर्णयामुळे चित्रपटाचे काम वेळेच्या आधीच पूर्ण होणार असून प्रोड्यूसरचा खर्च वाचणार आहे.
लोकल टीमच्या मदतीने दोन वेगवेगळ्या यूनिट्ससोबत अक्षयकुमार एकाच वेळी शूट करणार आहे. यामुळे अनलॉकनंतर प्रत्येक तासांत जास्तीत जास्त काम पूर्ण करणारा हा पहिला चित्रपट ठरणार आहे. विशेष म्हणजे, पूजा एंटरटेन्मेंटने आपल्या सेट्सवर कलाकार आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेबाबत संपूर्ण खबरदारी घेतलेली आहे.