इंदुरीकरांच्या समर्थनार्थ रविवारी अकोले बंद

सर्वपक्षीय बैठकीत घेतला निर्णय : ग्रामपंचायतींचे ठराव करणार गोळा

अकोले  – अकोले तालुक्‍याचे भूमिपुत्र व प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ येत्या रविवारी (दि.23) अकोले तालुका बंदचा निर्णय आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. तसेच तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतींचे ठरावही गोळा करण्यात येणार आहेत. याबाबत तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदनही देण्यात आले.

अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष के. डी. धुमाळ यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत तृप्ती देसाई यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. इंदुरीकर महाराजांनी माफी मागूनही त्यांच्या तोंडाला काळे फासण्याची भाषा देसाई करीत आहेत. तसेच कुणाच्यातरी दबावाखाली येऊन महाराजांवर गुन्हा नोंदवण्याच्या हालचाली पडद्याआड सुरू आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

पुत्रप्राप्ती विषयी केलेले वक्तव्य आपण कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी केलेले नव्हते. पण तसे घडले असल्यास आपण आपले निवेदन मागे घेत असून, सर्वांची जाहीर माफी मागत आहोत, अशी भूमिका इंदुरीकर महाराजांनी घेतल्यानंतरही विकृत मनोवृत्तीचे लोक महाराज व तालुक्‍याला बदनाम करीत असल्याने उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतींचे ठराव गोळा करण्यात येत आहेत आणि त्यानुसार महाराजांवर गुन्हा नोंदवणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात लढा सुरू ठेवणारा पवित्रा त्यात घेण्यात आला आहे. मोटारसायकल रॅली काढून गावोगावी याबाबत जागृती केली जाणार आहे आणि ठराव गोळा करून ते मोर्चाच्या दिवशी रविवारी शासनाला सादर केले जाणार आहेत. हा तालुका क्रांतिकारकांचा आहे.

तरीही शांततामय पद्धतीने टाळ-मृदंगाच्या साथीने दिंडी काढून, भजन करून अकोले तालुका वारकरी संघटना व समस्त अकोले तालुक्‍यातील नागरिक या मोर्चात सामील होतील, अशी भूमिका देवस्थानचे अध्यक्ष धुमाळ यांनी मांडली. राजेंद्र महाराज नवले, दीपक महाराज देशमुख, अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले, अशोकराव देशमुख आदींनी या वेळेस देसाई यांच्या भूमिकेवर आमची भावना तीव्र आहे आणि यातून या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते, असा इशारा दिला.

दरम्यान राज्य शासनाने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवला जाणार नाही, असे धोरण घेतले आहे, असे कळाल्यावर वारकरी संप्रदायाकडून आभार व्यक्त केले गेले. आज सायंकाळी अगस्ती आश्रम राम मंदिर येथे महाराजांच्या समर्थनार्थ रॅली, दिंडी मोर्चा व महासभा व ग्रामसभांचे ठराव मिळवणे या नियोजनाचे झालेल्या कामाचा आढावा व पुढील कार्याची दिशा ठरविण्यासाठी बैठक झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.