अकोला | बियाणे, खते, किटकनाशके शेतकऱ्यांना बांधावर उपलब्ध करुन द्या – पालकमंत्री बच्चू कडू

खरीप हंगाम 2021 नियोजन सभा : 4 लाख 71 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

अकोला – खरीप हंगाम 2021 करीता जिल्ह्यात चार लाख 71 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन पिकाखाली दोन लाख 9100 हेक्टर क्षेत्र असून कापूस पिकाखाली एक लाख 47 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व वाजवी दरात तसेच थेट बांधावर बियाणे, खते, किटकनाशके इ. कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यंत्रणेस दिले.

ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी (दि.7 मे) झालेल्या या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावर, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत, महाबीज विभागीय व्यवस्थापक जगदिशसिंग खोकड, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तेराणीया आदी अधिकारी सहभागी झाले होते.

या बैठकीस मार्गदर्शन करतांना मंत्री कडू म्हणाले की, सोयाबीन लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरचे बियाणे वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी तसेच सोयाबीन पेरणीबाबत तांत्रिक तपशील हा अधिक सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. त्यासाठी व्हिडीओ तयार करुन समाजमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. तसेच सोयाबीन सोबत आंतरपिकेही घ्यावी. शासनाने सोयाबीन लागवडीबाबत जारी केलेला चतुःसुत्री कार्यक्रम अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे सांगितले. शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपासाठी नियोजन करावे. तसेच बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी कृषी सेवाकेंद्रांमार्फत होणाऱ्या पेरणीचे नियोजन करुन बियाण्यांचे वितरण व्हावे.

प्रत्येक गावात कृषी सेवक हजर असले पाहिजे यासाठी कृषी सेवकांचे कार्यक्रम जाहीर करा. तसेच खते बियाणे यांच्या वाजवी दरात उपलब्धतेबाबतही प्रशासनाने नियोजन करुन दरांवर नियंत्रण ठेवावे. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी कापूस लागवड ही एक जून नंतर होणे अपेक्षित आहे. त्यासाठी बियाण्यांचे वितरणही एक जून नंतर करावे, अशी सुचनाही करण्यात आली. शेतकऱ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा प्रचार व प्रसार करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

खरीप हंगाम नियोजनातील महत्त्वाचे मुद्दे

पिकनिहाय क्षेत्र – सोयाबीन- दोन लाख 9100 हेक्टर, कापूस एक लाख 47 हजार हेक्टर, तूर 51 हजार 200 हेक्टर, मूग-35 हजार 150 हेक्टर, उडीद- 16 हजार 125 हेक्टर, ज्वारी-8700 हेक्तर, मका 285 हेक्टर, असे जिल्ह्यात एकूण 4 लाख 71 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन आहे.

बियाणे उपलब्धता- सोयाबीन पिकासाठी एक लाख 56 हजार 825 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी 32 हजार 299 क्विंटल बियाण्याची मागणी आहे. त्यापैकी 28 हजार क्विंटल महाबीज व कृभको मार्फत तर खाजगी उत्पादकांकडून 5999 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तर शेतकऱ्यांकडे एक लाख 67 हजार 156 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. कापूस पिकासाठी 3675 क्विंटल (7 लाख 35 हजार पाकिटे) बियाणे लागणार असून हा पुरवठाही खाजगी उत्पादकांकडून 3666 व्किंटल तर महाबीज कडून नऊ क्विंटल बियाणे उपलब्धता होणार आहे. तूर पिकासाठी 2688 क्विंटल बियाण्याची मागणी असून महाबीज मार्फत 2100 क्विंटल महाबीज तर खाजगी उत्पादकांकडून 588 क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार आहे.

खतांची उपलब्धता- जिल्ह्यात 95 हजार 700 मेट्रीक टन खतांची मागणी असून जिल्ह्याला 77 हजार 990 मेट्रीक टन आवंटन मंजूर आहे. गत वर्षीचे 18 हजार 696 मेट्रीक टन खत शिल्लक असून खतांचे आवंटन उपलब्ध होत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.