अकलूज -संग्रामनगर हद्दीतील दोन जणांना करोनाची लागण झाली असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी दिली. या दोन पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठावण्यात आले आहेत. करोना पॉझिटिव्ह रुग्ण हे होलसेल किराणा व्यापारी असल्याने संपर्क लिस्ट वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी वैराग येथे एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. 12 दिवसांपूर्वी त्याच्या संपर्कात अकलूज (ता. माळशिरस) येथील संग्रामनगरमधील दोघेजण आले होते, ही माहिती मिळताच प्रशासनाने दोघांना दोन दिवसांपूवी होमक्वारंटाइन करून त्यांचा अहवाल तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवला होता.
(दि. 27) सकाळी दोन्ही व्यक्तींचा आहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील नऊ जणांना अकलूज परिसरातच क्वारंटाइन केले असून, त्यांचे तपासणी अहवालही येणे बाकी आहेत. रुग्णाच्या घराजवळील तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर सील केलाआहे.