लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वी आज (बुधवार) राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह यांनी लखनऊ येथील लोहिया ट्रस्टमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेत तासभर चर्चा केली. या चर्चेनंतर संजय सिंह यांना युतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी, “आम्ही एकमेकांशी बोलत आहोत आणि युतीच्या दिशेने जात आहोत.” असे स्पष्ट उत्तर दिले.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप सहज बहुमत प्राप्त करेल असे निरीक्षण निवडणूकपूर्व सर्वेक्षणांतून वर्तवण्यात येत आहे. राज्यात समाजवादी पक्ष दुसऱ्या, तर बसपा तिसऱ्या स्थानावर राहील असे दिखील सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे. असं असलं तरी उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री व सपाप्रमुख पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न करतायेत. आज आम आदमी पक्षासोबत झालेली चर्चा त्याचाच एक भाग आहे.
दरम्यान, अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय सिंह यांनी, “भ्रष्टाचारमुक्त उत्तर प्रदेश आणि हुकूमशाही राजवट नष्ट करायची आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. आज मुक्त उत्तर प्रदेश निर्माण करण्यासाठी राजकीय चर्चा करण्यात आल्या.” असं सांगितलं. तसेच समाजवादी पक्ष व आम आदमी पक्ष युतीच्या दिशेने जात असल्याचं देखील ते म्हणाले.
समाजवादी पक्ष राज्यात एमआयएम पक्षाशी युती करेल अशी देखील चर्चा सुरु आहे. याबाबत अखिलेश यादव यांनी, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याशी अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.
तत्पूर्वी, अखिलेश यादव यांनी मंगळवारी राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांची भेट घेतली होती. येणाऱ्या विधानसभांसभा निवडणुकांमध्ये आरएलडी व सपा एकत्र लढणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.