अगोदर चहावाले होते आता रखवालदार झाले
लखनौ – 2014 मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी स्वत:ला चहावाला संबोधले होते. त्यामुळे 2014 मधील लोकसभा निवडणूक बऱ्याच अंशी चहावाला पंतप्रधान होणार या चर्चेच्या आजूबाजूला फिरत होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली चहावाला ओळख मागे सोडून चौकीदार रूप धारण केले आहे. त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.
विरोधकांकडून चौकीदार मुद्द्यावरून मोदींवर जोरदार टीका करण्यात येत आहे. आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. फरुखाबाद येथे आयोजित सभेत अखिलेश त्यांनी चहावाला पंतप्रधान याची फिरकी घेतली. मोदी चहावाले असतील तर आम्ही पण दूधवाले असल्याचे अखिलेश यांनी म्हटले.
मतदारांना संबोधित करताना अखिलेश म्हणाले की, आधी मोदी चहावाला म्हणून जनतेसमोर आले होते. आता तेच मोदी चौकीदार म्हणून समोर आले आहेत. परंतु या चौकीदाराला धडा शिकवण्याची वेळ आल्याचे अखिलेश यांनी सांगितले.
चहा बविण्यासाठी दूध आवश्यक असल्याचे सांगत ते चहावाले असतील तर आम्ही देखील दूधवाले आहोत. जोपर्यंत दूध चांगलं मिळत नाही, तोपर्यंत चहा चांगला होऊ शकत नाही, असा टोला अखिलेश यांनी यावेळी लगावला. उत्तर प्रदेशात मोदी यांना रोखण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा दावा त्यांनी केला.