अखिलेश-मायावतींकडून जागावाटपाचे चित्र स्पष्ट! अमेठी-रायबरेलीबाबत ‘मोठा’ निर्णय

लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातील राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून युती आणि आघाड्यांच्या घोषणांचे सत्र सध्या देशभरामध्ये सुरु आहे. अशातच आता भारतातील लोकसभा जागांच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये देखील निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहे. उत्तरप्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ‘बुआ-भातीजे’ म्हणजेच ‘सपा-बसपा’ अशी आघाडी पाहायला मिळणार असल्याचे याआधीच अखिलेश आणि मायावतींकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र या सपा-बसपाच्या आघाडीमध्ये काँग्रेस देखील भाग घेणार काय? यावर राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत होते.

परंतु आज अखिलेश आणि मायावतींकडून उत्तरप्रदेशातील लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपाचे चित्र स्पष्ट करण्यात आल्याने सपा-बसपाच्या आघाडीतून काँग्रेसचा पत्ता कट झाला आहे. उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या एकूण ८० जागांपैकी ७५ जागांवर ‘सपा-बसपा’चे एकमत झाले असून बहुजन समाज पक्षाला ३८ तर समाजवादी पक्षाला ३७ जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

यापूर्वीच मायावतींकडून देण्यात आलेल्या शब्दानुसार काँग्रेसचा गड समजले जाणारे अमेठी आणि राय बरेली हे दोन मतदार संघ ‘सपा-बसपा’कडून लढवले जाणार नाहीत. उर्वरित तीन जागांवर अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोक दलाला देण्यात येण्याची चिन्हे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.