नवी दिल्ली – सचिन तेंडुलकरचा मुलगा असला तरीही अर्जुन तेंडुलकरला त्याची गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल तरच मोठ्या स्तरावरील क्रिकेट खेळता येइल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपोटिझम नाही, अशा शब्दात माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्राने क्रिकेटमध्ये नेपोटिझम असल्याच्या टीकेचा इन्कार केला आहे.
नेपोटिझमचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम झाला आहे का, या प्रश्नावर चोप्राने आपले मत मांडले. जगभरात अनेक क्रिकेटपटू असे आहेत की, ज्यांची मुलेदेखील क्रिकेट खेळले आहेत. मात्र, त्यांना वडिलांच्या कामगिरीचा लाभ झाला नाही. तसेच या खेळाडूंनी कधीही आपल्या नावाचा वापर आपल्या मुलासाठी केला नाही.
जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत. विक्रमादित्य सुनील गावसकर, रॉजर बिन्नी ही तर भारतातील उदाहरणे पाहिली तर क्रिकेटमध्ये नेपोटिझम नाही हे सगळेच मान्य करतील. या दिग्गज खेळाडूंची मुलेही क्रिकेटपटू बनली मात्र, त्यांनी त्या दर्जाची कामगिरी केली नाही व त्यामुळेच आज त्यांना भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. अर्जुनने सरस कामगिरी केली तरच त्याला मोठ्या स्तरावरील क्रिकेट खेळता येईल. सचिन त्याच्या नावासाठी कधीही आग्रह धरणार नाही, असेही चोप्राने सांगितले.