“बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटात काम करणारी अभिनेत्री आकांक्षा सिंह लवकरच पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आकांक्षाने “मेडे’ चित्रपट साइन केला असून यात ती अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटात अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंह आणि अंगिरा धर आदी कलाकारही मुख्य भूमिका साकारत आहेत. आकांक्षा म्हणाली, “मेडे’ चित्रपटात मला संधी मिळाल्याने मी खूपच आनंदी आहे. अशा मोठया आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात काम करण्यास मिळेल हे स्वप्नवतच वाटत आहे.
मी अजय सर आणि अमिताभ सर यांच्यासोबत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. तसेच अजय सरच चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्याने ते आणखीन रोमांचक ठरेल. याशिवाय माझी भूमिकाही महत्त्वाची असल्याने मी उत्तम परफॉर्म देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आकांक्षाने सांगितले.
दरम्यान, अजय देवगणने काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगबाबत माहिती देणारे एक ट्वीट केले होते. या तो म्हणाला होता की, एक स्टार्ट-टू-फिनिश शेड्यूलमध्ये “मेडे’ची सुरूवात केल्याने आनंदी आहे. तसेच ईश्वर आणि आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. माझे प्रशंसक, कुटुंबिय आणि शुभचिंतकांच्या पाठबळाशिवाय हे पूर्ण होवू शकत नाही. 29 एप्रिल 20222ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.’