शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर बुधवारी गोळीबार करण्यात आला. भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या अमृतसरच्या जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिराच्या गेटवर त्यांच्यावर हा हल्ला केला गेला. बादल यांच्या सुदैवाने ते हल्ल्यातून बचावले. एक गोष्ट या घटनेतून अधोरेखित मात्र झाली, ती म्हणजे शिखांसाठी वेगळे खलिस्तानची जी मागणी काही देशविघातक शक्तींकडून केली जाते आहे ती केवळ वर्तमानपत्रांतील मथळे आणि वाहिन्यांवरील ब्रेकिंग न्यूजच्या पलीकडे गेली असून हा फुटीरतावाद पुन्हा एकदा डोके वर काढून उभा राहू पाहतो आहे.
पंजाब पोलिसांच्या साध्या वेषातील एका अधिकार्याने सतर्कता बाळगत वेळीच हालचाल केल्यामुळे बादल यांचे प्राण बचावले. तरीही पाकिस्तानच्या सीमेलगत असणार्या या राज्यात सुरक्षेच्या संदर्भात जी अधिक सतर्कता बाळगली जाणे आवश्यक आहे तशी ती नसल्याची त्रुटीही समोर आली आहे. 2007 ते 2017 या काळात पंजाबमध्ये बादल यांच्या पक्षाचे सरकार होते. त्यावेळी बाबा राम रहिमच्या संदर्भात श्री अकाल तख्तच्या जथ्थेदारांवर दबाव आणल्याचा आरोप बादल यांच्यावर होता. इतरही काही धार्मिकदृष्ट्या अप्रिय अशा गोष्टी त्या काळात पंजाबमध्ये घडल्याचा आरोप होता. श्री अकाल तख्त साहेबमध्ये सुखबीर यांचे पिता व पंजाबचे दिग्गज नेते दिवंगत प्रकाशसिंग बादल यांना पूर्वी दिला गेलेला सन्मान मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच सुखबीर यांना धार्मिक सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात आली. त्यानुसार ते सेवा करण्यासाठी आले असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
इतर संवेदनशील धार्मिक ठिकाणी ज्याप्रमाणे कडेकोट सुरक्षा तैनात असते तशीच ती सुवर्ण मंदिरातही आहे. मात्र, ती बाहेरच्या बाजूला आहे. अन्य ठिकाणी भाविकांना आत सोडताना जी तांत्रिक पद्धतीने तपासणी केली जाते तशी येथे होत नाही. सरकार श्रद्धेच्या विषयात अनावश्यक हस्तक्षेप करत नाही, ही चांगली बाब आहे. तथापि, याचाच फायदा घेत पूर्वाश्रमीचा दहशतवादी असलेल्या व्यक्तीने सुखबीर यांच्यावर गोळी झाडण्याचे धाडस केले. सुखबीर हे कोणी सामान्य भाविकासारखे तेथे गेले नव्हते. त्यांचा इतिहास सर्वज्ञात असताना त्यांच्या सुरक्षेची विशेष दक्षता घेतली जाणे आवश्यक होते. शस्त्र आत गेलेच नसते तर पुढे गोळीबाराची घटनाही घडली नसती. हल्लेखोराने एकट्याने आणि तत्कालीक किंवा जुन्या कोणत्या रागातून हे कृत्य केले की यामागे कोणती संघटना होती व त्यांचा सुनियोजित कट होता ज्याद्वारे त्यांना केवळ पंजाबच नाही तर संपूर्ण भारताला संदेश देण्याचा इरादा होता या बाबी लवकरच स्पष्ट होतील. एकमात्र खरे की कोणत्याही कट्टर विचारसरणीने प्रेरित होऊन कोणते धोकादायक कृत्य करताना धर्माचाच आधार घेतला जातो किंवा धर्माच्या पडद्याआड जात ती कृती केली जाते याची पुन्हा एकदा प्रचिती आहे. सुखबीर यांना धार्मिक शिक्षा सुनावली असल्यामुळे एकप्रकारे जनभावना आता त्यांना प्रतिकूल असेल असे गृहीत धरून याच संधीचा लाभ घेत त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला, हे स्पष्ट दिसते आहे.
हल्लेखोराचा पूर्वेतिहास पाहता तो विभाजनवादी संघटनेत सक्रिय होता. तो पाकिस्तानातही जाऊन आला असून विविध गुन्ह्यांखाली त्याला कारावासही भोगावा लागला आहे. गेल्या वर्षभरापासून भारतात आणि भारताबाहेर ज्या खलिस्तानवादी वृत्तींनी पुन्हा डोके वर काढले आहे त्यांच्या कारवायांमध्येही तो सहभागी होता ही माहितीही समोर आली आहे. विविध देशांतील भारतीय दूतावासांना या शक्तींनी लक्ष्य केले तसेच भारतातही त्यांनी पोलीस यंत्रणेला थेट आव्हान देण्याच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या. कॅनडात काय होते आहे ते सगळ्यांनी पाहिले आहे. पंजाबमधील व्यावसायिक शीख बांधवांनी याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कारण अशी अशांतता निर्माण झाली की त्याचा सगळ्यांत पहिला फटका व्यवसायाला व पर्यायाने अर्थकारणाला बसत असतो. पंजाबमध्ये 80-90 च्या दशकात जी स्थिती होती ती भयंकर होती.
नव्वदच्या दशकाच्या मध्यापर्यंत ती बर्यापैकी आटोक्यात आणली गेली. मात्र, तोपर्यंत राज्याचे आणि तेथील युवा पिढीचे व अनेक कुटुंबांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले होते. त्या कालखंडात जन्म झाला नसलेल्या आजच्या पिढीला याचे सखोल ज्ञान असणे शक्यच नाही आणि केवळ वाचनातून जरी त्या काळातील माहिती त्यांनी मिळवली असली, तरी त्या वास्तवाची दाहकता त्यांच्यापर्यंत तेवढी गंभीरपणे पोहोचली असेलच असेही नाही. या पिढीवरच अलीकडे नव्याने उदयाला आलेल्या अमृतपाल सिंग आदी घटकांची मदार आहे. पंजाबला अंमलीपदार्थांनी विळखा घातला आहेच आणि त्यात भरकटलेल्या पिढीच्या नशेखोरीला ग्लॅमर देण्याचा प्रयत्नही झाला आहे.
समाज माध्यमांच्या मदतीने चुकीच्या माहितीचा प्रसार आणि भारतीय संस्था आणि व्यक्तींना देशात आणि देशाबाहेर लक्ष्य करण्याची स्टंटबाजी करून या पिढीला भुलवण्याचेच काम होते आहे. दिल्ली आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणांच्या भिंती घोषणांनी रंगवून आणि परदेशात बसून भारताला तोडण्याची भाषा करणारे व्हिडिओही प्रसारित केले जात आहेत. हा सगळा प्रकार आता अत्यंत गांभीर्याने मात्र संयतपणे आणि तेवढ्याच धोरणीपणाने हाताळण्याची गरज आहे. अशांतता येताना काही मागत नसते, मात्र, जेव्हा ती येते आणि परत जाते तेव्हा तिचे मूल्य फार मोठे असते व अनेक पिढ्यांना त्याची भरपाई करावी लागते.