अजमेरच्या दर्ग्याची तपासणी

अजमेर, (राजस्थान) – राजस्थानमधील अजमेर इथल्या प्रसिद्ध दर्ग्याची तपासणी करायला पोलिसांनी काल रात्रीपासून सुरुवात केली आहे. दर्ग्याच्या परिसरामध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ही कारवाई सुरू केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही तपासणी आता दररात्री केली जाणार आहे. सोमवारी पहिल्यांदाच रात्री तपासणी केली गेली, तेंव्हा दर्ग्याच्या परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या सुमारे 100 जणांना बाहेर काढण्यात आले.

दर्गा कमिटी आणि अंजुमन कमिटीच्या समन्वयाने पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. यात्रेकरू बनून येणारे लोक दर्ग्याच्या परिसरात कायम स्वरुपी आश्रय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही कारवाई सुरू केली गेली आहे. सोमवारी रात्री 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान केलेल्या तपासणी दरम्यान दर्ग्याच्या परिसरामध्ये पाकिटमारी करणारे काही जणही ताब्यात घेण्यात आले आहेत.

दर्ग्याच्या परिसरात राहणारे अनेक जण जरी यात्रेकरू बनून आले असले, तरी त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. दर्ग्याच्या कमिटीकडूनही त्या लोकांची ओळख पटू शकलेली नाही. अशा लोकांकडून सुरक्षिततेला धोका संभवत असल्यानेच दर्ग्याची वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे, असे अजमेरचे पोलिस अधिक्षक के. राष्ट्रदीप यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.