पुणे – राज्यात एकीकडे आरक्षणावरून वातावरण तापलेले असताना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी देखील विधानसभा अध्यक्षांकडे सुरु आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मातोश्रींनी आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी जाहीर इच्छा माध्यमांसमोर बोलू दाखवली होती. नुकतच पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनार्थ काही बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार (Ashatai Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी जाहीर इच्छा व्यक्त केली होती.त्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) सचिन खरात गटातर्फे (Sachin kharat) करण्यात आलेली बॅनरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. पुण्यात एबील हाऊस चौकात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
“आई तुमच्या देखतच अजितदादा मुख्यमंत्री होणार” अशा आशयाचे बॅनर सचिन खरात गटाकडून लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यावर बॅनरवर अजित पवारांसह त्यांच्या मातोश्रींचा फोटो देखील लावण्यात आला आहे.
काय म्हणाल्या होत्या अजित पवारांच्या मातोश्री नेमकं
“अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच (माझ्या हयातीत) मुलाने मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, आता पाहुयात”अशी इच्छा आशाताईंनी यावेळी व्यक्त केली होती.