अजितदादा…सर्वसामान्यांना आपला वाटणारा नेता!

आज अजितदादांना 60 वर्षे पूर्ण होत आहेत. मी अजितदादांकडे पाहतो, ज्यांची महाराष्ट्राप्रती निःस्वार्थ निष्ठा, विकासाची दूरदृष्टी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आधार व मार्गदर्शनामुळे आज त्यांनी त्यांच्या सुमारे 40 वर्षांच्या समाजकारण आणि राजकारणाच्या कार्यकाळात असंख्य कार्यकर्ते घडवले, असे असामान्य आणि “बोले तैसा चाले’ या उक्‍तीचा पदोपदी प्रत्यय देणारे दादा…होय अजितदादा सर्वसामान्यांना आपला वाटणारा नेता.

अजितदादा आणि सर्वसामान्य कार्यकर्ता यांची नाळ इतकी जुळली आहे, की वेळ आणि काळ यातून त्यांचा विश्‍वास नेहमीच दिसून येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, आज माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन 2016-17 मध्ये पुण्याचे महापौरपद भूषविता आले. यापूर्वीही सन 1199चा काळ अवघ्या वयाच्या 21 व्या वर्षी अजितदादांसारखं कर्तृत्त्ववान नेतृत्व मिळालं. केवळ अजितदादांमुळेंच मी राष्ट्रवादीत आलो. दादा नेहमीच तरूण कार्यकर्ते निर्माण करतात. त्यांना योग्यवेळी संधीही देतात. 130 स्पर्धक असताना दादांनी माझ्यावर विश्‍वास ठेवून मला पीएमटीचे सदस्यपद दिले. त्यानंतर संचालकही केले. हे ऋण कधीही न विसरता येणारे आहे. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची बारिक माहिती दादांकडे आहे.

चुकीचे काम दादांसमोर घेऊन जाणारी व्यक्‍ती कधीच टिकत नाही. तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचेही ते कधी विसरत नाहीत. दादांचा हात ज्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर आहे, त्याला समाज आणि राजकारणात किती मानसन्मान आणि आपुलकी आहे, हे मला समजले.

दादांच्या नेतृत्वामुळेच विकास
समाजाचा विकास व्हावा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे राहणीमान उंचवावे, त्यांचे जीवन सुखकर व्हावे या ध्येयाने दादांचे कामकाज आजही सुरूच आहे. राजकारण केवळ सत्ता व खुर्चीसाठी काही तरी करीत राहायचे, असा दृष्टीकोन न बाळगता लोकांसाठी आपले आयुष्य वेचण्याचा प्रयत्न त्यांचा आहे.

दादांचे कार्य म्हणजे विकासकार्याचा अखंड यज्ञच आहे. सत्तेत असताना आणि आजही शासकीय पातळीवरील विविध खात्यांचे, संस्थांचे निर्णय, विकासकामांचा आराखडा, भावी पिढ्यांचा विचार, निधीचा योग्य वापर दर्जेदार करणे हा तर दादांचा पिंडच आहे. राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारसाहेब यांच्याकडून दादांनी राजकारण आणि समाजकारणाचे धडे गिरवून कर्तृत्वाची छाप पाडली आहे. साहित्य संमेलने, क्रीडा स्पर्धा, पुरस्कार समारंभ, व्याखानमालांमधील त्यांची उपस्थिती, शासकीय कार्यक्रम, राजकीय व्यासपीठ, चर्चासत्रे, उद्‌घाटने, भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांतील त्यांची अभ्यासूवृत्ती लपून राहत नाही. कामात कुचराई करणाऱ्यांना दादा कधीही माफ करत नाहीत किंवा पाठीशी घालत नाहीत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकारणाचा तर त्यांनी नूरच पालटवला. एखादी गोष्ट प्रशासकीय अधिकाऱ्याने वेळेत केली नाही तर त्यांना खडसावण्याचे धारिष्ट्यही त्यांनी दाखविले आहे.

कामाचा उरक, दृरदृष्टी आणि प्रशासनावर असलेली पकड यामुळे दादा पुण्याचे दहा वर्षे पालकमंत्री असताना शहरातील विविध प्रकल्प अतिशय जलद गतीने मार्गी लागले. दादा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व उर्जामंत्री असताना धोरणात्मक निर्णय घेत पुणे शहर व जिल्ह्याचा विकास साधला. अजित दादा म्हटले, की कामाचा रिझल्ट द्यावाच लागतो. तेथे कारण चालत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठका आणि त्यातील निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी होऊन कामे मार्गी लागली जायची.

त्यामुळे आपल्या जिल्हा, शहर आणि राज्याला अजित दादा यांच्या नेत्वृत्वाची आजही खऱ्या अर्थाने गरज आहे. तरूणांनी संधीचा लाभ घेऊन त्याचे सोने करावे, यासाठी मार्गदर्शन आणि सहाय्य करण्याची त्यांची वृत्ती आहे. दादांची राजकीय, सामाजिक कारकीर्द सतत वरच्या क्रमांकाची राहिली पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. येणाऱ्या काळात दादांच्या रूपाने एक अभ्यासू, शिस्तप्रिय, स्पष्टवक्ता व निर्भिड मुख्यमंत्र्याची महाराष्ट्राला गरज आहे. असे आम्हाला वाटते आणि हीच शुभेच्छा दादांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने…

– प्रशांत जगताप (माजी महापौर, विद्यमान नगरसेवक)

शब्दांकन – विवेकानंद काटमोरे, हडपसर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)