अजितदादा : कार्यकर्त्यांचे अखंड ऊर्जास्रोत

माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे “बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या भूमिकेतून सातत्याने कार्य करीत आहेत. प्रशासनावरील जबरदस्त पकड, रोखठोकपणा, स्पष्टवक्तेपणा, पारदर्शी कारभार यामुळे सर्व पक्षातील नेत्यांना दादांच्या कार्यशैलीचे कौतुक वाटते. जनसामान्यांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण आहे. किंबहुना त्या मुद्द्यावर ते अत्यंत संवेदनशील बनतात. त्यांची वक्‍तृत्वशैली सर्वसामान्य बहुजन समाजाला आपलेसे करणारी आहे. विरोधकांनी केलेली टीका खिलाडूवृत्तीने ते घेताना आढळतात. त्यांच्या या शैलीस विनोदाची सूक्ष्म झालर आढळते. त्यामुळे सर्वसामान्यांना दादा आपलेसे वाटतात. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा.

मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एक बहुआयामी आणि पारदर्शक राजकीय व्यक्‍तिमत्त्व, कृषीजीवन, जनसामान्य व युवा वर्गाशी त्यांचे अतूट नाते आहे. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. एक अभ्यासू, मुरब्बी, रोखठोक, स्पष्टवक्ते, मुत्सद्दी राजकीय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे. लोकनेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वातून विधायक दिशा घेत अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या तत्पर व आक्रमक कार्यशैलीने आपले अस्तित्व निर्माण केलेले आहे. त्यांचे संघटनकौशल्य, धडाडी, तत्परता, नेतृत्वगुण व प्रशासनावरील पकड यांचे कौतुक पवारसाहेबांसारख्या दिग्गज नेत्यांपासून ते त्यांचे विरोधकही खुल्या मनाने मान्य करतात.

अजितदादांना प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य तसेच अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बळ आजी शारदाबाई पवार व मातोश्री आशाताई पवार, “सहकारातून सर्वोदय’ ही विचारधारा आजोबा कै. श्री गोविंदराव पवार व अर्थातच राजकीय गुरू मा. शरद पवार साहेब यांच्याकडून मिळालेली आहे. राजर्षी शाहू महाराज, सत्यशोधक महात्मा फुले, महर्षी शिंदे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारांच्या संस्कारातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना उत्तम संस्कारांबरोबरच शेती, राजकारण, समाजकारण यांचे संस्कारही त्यांच्यावर नकळत झालेले आहेत. त्यामुळेच लोकांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्षयात्रा काढली.

गेल्या 25 वर्षांत कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, पाटबंधारे, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, अर्थ व नियोजन, ऊर्जा आदी खाती सांभाळताना त्यांनी प्रत्येक खात्यावर आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे. महाराष्ट्र फळबागायत व अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. दुग्ध उत्पादन व पशुपालनात याच काळात महाराष्ट्राने गरूडझेप घेतली. बारामतीचा संपूर्ण कायापालट होत असताना महाराष्ट्र हे देशातील नंबर एकचे राज्य बनले. महिलांच्या बाबतीतही त्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी व पुरोगामी आहे. त्यामुळेच युवती कॉंग्रेसच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. तसेच कोपर्डी प्रकरणातील महिलेला न्याय मिळावा यासाठी अत्यंत आक्रमकतेने तो प्रश्‍न विधिमंडळ अधिवेशनात मांडला. या प्रश्‍नी राजकारण न करता राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारावी याची जाणीव सत्ताधाऱ्यांना करून दिली महिलांवरील अत्याचार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

एकहाती सत्ता असेल तर प्रभावीपणे विकास होऊ शकतो हे दादांनी बारामती नगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे केलेल्या विकास कामांवरून दाखवून दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान बहुमोल स्वरूपाचे आहे. स्व. बाबुरावजी घोलप साहेब यांनी लावलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या रोपट्याचे आज अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. या संस्थेच्या माध्यमातून लाखो डोंगरी आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोयीसुविधांनी युक्त शैक्षणिक संकुलातून खेड्यापाड्यातील बहुजन समाजातील लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजकारणात असूनही दादांनी कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या क्षेत्रांची आपली घट्ट वीण ठेवत रसिकता शाबूत ठेवली आहे.

विविध खेळांशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळेच दादांकडे कमालीची खिलाडूवृत्ती आहे. कबड्डी, कुस्ती, खो-खो यासारख्या क्रीडा प्रकारांना व क्रीडापटूंना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम दादांनी केले. माझा महाराष्ट्रातला खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी त्यांची तळमळ आहे. यासाठी दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून शालेय स्तरापासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून दिले. तसेच पुणे ते बारामती राष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. खेळाडूंना मानधन योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री असताना राज्यात विविध खात्यांत खेळाडूंना सामावून घेण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांबद्दल दादांना आस्था आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा मिळावा म्हणून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची स्थापना, नाना-नानी पार्क, ज्येष्ठांसाठी पेन्शन योजना इत्यादी अनेक बाबींकडे दादांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन महाराष्ट्रातील तमाम वयोवृद्धांना दिलासा दिला आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण, आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या धोरणांचा विस्तार व प्रभावी अंमलबजावणी करून महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणण्याची ताकदसुद्धा दादांकडेच आहे. आज असंख्य नवतरूण आदरणीय दादांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन विधायक व सकारात्मक राजकारणात येत आहेत, हे चित्र आशादायी आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने दादांना दीर्घायुरारोग्य, शक्‍ती, प्रचंड ऊर्जा लाभो ही सदिच्छा!

– ऍड.संदीप कदम (मानद सचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे. सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)