Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लिअरजेट-४५ XR प्रकारच्या चार्टर्ड विमानाचे लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटले आणि त्याने धावपट्टीजवळ कोसळून पेट घेतले. या अपघातात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विमानातील इतर चार जणांचाही (पायलट सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि सुरक्षा अधिकारी विदीप जाधव) यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर गाढ शोककळा पसरली असून, राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात आला आहे. २९ जानेवारी रोजी बारामतीत अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो कार्यकर्ते, नेते आणि सामान्य नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले. या अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार हे ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेशी थेट नाळ जोडलेले नेते म्हणून ओळखले जात होते. ते भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेतृत्व कोण करेल, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. Ajit Pawar अजितदादांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि चाहते भावनिक झाले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील विलास झोडपे हे अजित पवारांचे खास प्रेमळ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विलास यांनी “अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईपर्यंत डोक्याचे केस कापणार नाही” अशी शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांचे वाढलेले केस पाहून अजित पवार यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मिश्कील शब्दांत समजावले होते. ते म्हणाले होते, “विलास, तू केस वाढविल्याने मी मुख्यमंत्री होणार नाही. लोकशाहीत मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागते. तुझ्यासारखे कार्यकर्ते आमदार झाले पाहिजेत. केस वाढविल्याने तू बाई आहेस की माणूस तेही कळणार नाही. तेलाचा खर्च वाढेल. त्यापेक्षा लोकांची काम करा, पक्ष संघटना मोठी करा.” अजितदादांनी कार्यकर्त्याचे प्रेम पाहून त्याला कानपिचक्या देऊन प्रेमाने समजावले होते. अजितदादांना भेटण्यासाठी विलास झोडपे मुंबईत आले होते, पण थोड्याच वेळात अजितदादांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यानंतर ते मुंबईहून थेट बारामतीला गेले. पत्नी आणि दोन मुलांना नागपूरहून बोलावून घेऊन संपूर्ण कुटुंब अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले. आता अजितदादा नसल्याने, त्यांच्यासाठी वाढवलेले केस श्रद्धांजली म्हणून अर्पण करण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्कारानंतर विलास झोडपे यांनी नीरा नदीच्या संगमावर मुंडन करून केस कापले आणि ते नदीत वाहून दिले. “ज्यांच्यासाठी केस वाढवले, ते दादाच आता या जगात राहिले नाहीत. त्यामुळे हे केस कापून त्यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून मी नीरा नदीच्या संगमावर मुंडन करून ते अर्पण करत आहे,” अशा भावना विलास यांनी व्यक्त केल्या. हा निर्णय पाहून सर्वसामान्यांचे मन हेलावले गेले असून, सोशल मीडियावरही याची भावुक चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्यासारखा मातीशी जोडलेला, निर्णयक्षम आणि कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नेता दुर्मिळच. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक मोठा आधार गमावला आहे. हे पण वाचा : Sanjay Raut : अजित दादांच्या खुर्चीसाठी इतकी घाई? राऊतांनी उत्तराधिकाऱ्यांच्या चर्चेवरून नेत्यांना सुनावलं