अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीची राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव एकसारखेच आहे. अतिरिक्त आयुक्त अजित पवार हे त्यांच्या कामकाजामुळे सातत्याने आरोपांच्या फेऱ्यांमध्ये अडकू लागल्याने नाहक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची बदनामी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये यामुळे गैरसमज निर्माण होऊ लागल्याने अतिरिक्त आयुक्तांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व राजू मिसाळ यांनी केली आहे.
याबाबत भोंडवे व मिसाळ यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे, त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे नाव अजित पवार आहे. तर राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री यांचेही नाव अजित पवार आहे. अतिरिक्त आयुक्त हे महापालिकेत काम करताना सातत्याने त्यांच्या कारभारामुळे चर्चेत आहेत. वारंवार त्यांच्यावर आरोप होऊ लागले आहे.
वृत्तपत्रांसह विविध ठिकाणी अजित पवार या नावाने वृत्त प्रसिद्धी होत असून, नागरिकांमध्ये अजित पवारांबाबत संभ्रम निर्माण होत आहे. अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना अजित पवार हे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. याशिवाय बेजबाबदार अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध झाले आहेत. असाच प्रकार सुरू राहिल्यास नाहक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस तिढा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त पवार यांनी तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही निदर्शनास आणून दिले जाणार आहे.
अजित पवार हे भ्रष्ट अधिकारी – कलाटे
अतिरिक्त आयुक्त अजित पवार मनमानी करणारे आणि भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केला आहे. त्यांनी चालविलेल्या मनमानी विरोधात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहोत. पवार यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही कलाटे यांनी म्हटले आहे.