जयंत पाटील यांच्यांकडे पक्षनेतेपदाची जबाबदारी
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसशी बंडखोरी करत भाजपाला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची अखेर पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतापदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी आता जयंत पाटील यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाच्या दृष्टीने अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत.
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतापदावरून हकालपट्टी करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांचे व्हीप काढण्याचे तसेच पक्षनेता म्हणून असलेले सर्व अधिकारही रद्दबातल करण्यात आले आहेत. पक्षाच्या दृष्टीने सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार तसेच जयंत पाटील यांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
अजितदादांचे बंड फसणार
अजित पवार यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या 15 आमदारांपैकी बहुतांश आमदार हे पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. पक्षाच्या बैठकीला 50 आमदार उपस्थित असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या बंडावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन आमदारांना शिवसेनेच्या नेत्यांनी आणले
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन आमदारांना या बैठकीस आणले. संजय बनसोड आणि बाबासाहेब पाटील हे दोघे आमदार सहार हॉटेल इथे होते. तिथून शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सचिव मिलिंद नार्वेकर तसेच राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी त्या दोघांना सुरक्षितपणे बैठकीच्या ठिकाणी घेउन आले.