मुंबई – खातेवाटपाचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. हे खातेवाटप करताना एखादे खाते हलके आणि जड असा भेद न करता महाराष्ट्रात काम करायचे असल्यास कोणत्याही खात्याच्या माध्यमातून काम करता येते. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारमधील खातेवाटपाच्या प्रश्नावर दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर अजित पवार यांनी राज्याच्या प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, आम्हीदेखील सरकारमध्ये अनेक वर्षे काम केले आहे. काम करायचे म्हटले तर कोणतेही खाते स्वीकारून ते करता येते. फार वजनदार खाते एखाद्या कर्तृत्वशून्य व्यक्तीला दिले तर ती व्यक्ती कामाचा रिझल्ट देऊ शकत नाही. त्यामुळे खातेवाटपाबाबत कोणाला काय वाटते हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले.