गृहखात्याविषयी अजित पवारांचा मोठा खुलासा

गृह खाते आपल्याकडे नसल्याची दिली माहिती

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज विस्तार होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपण गृह खात्याबद्दल कोणतही वक्तव्य केले नसल्याचे म्हटले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाबद्दल स्थानिकांशी झालेल्या चर्चेदरम्यान अजित पवारांनी गृह खात आपल्याकडे असल्याचे वक्तव्य केल्याची चर्चा रंगली होती. मात्र आपण असे कोणतही वक्तव्य केले नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर जिल्हापरिषदेमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यामध्ये झालेल्या कालवा पाणी बैठकीदरम्यान सोलापूरमधील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी, लक्षात ठेवा गृह खातं माझ्याकडेच आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील कोणी फुटायचे नाही. जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचाच अध्यक्ष झाला पाहिजे,अशा शब्दांमध्ये पदाधिकाऱ्यांना दम दिल्याची चर्चा होती. बैठकीनंतर जवळजवळ दोन दिवस जिल्ह्यामध्ये ही चर्चा रंगली होती. मंत्रिमंडळाचा विस्तार अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पवारांच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले होते.

अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना गृह खात्याचा संदर्भ देत दम भरल्याचे वृत्त समोर आल्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांनी बैठकीमध्ये नक्की काय घडले याबद्दलची माहिती दिली. अडीच वर्षांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सोलापूरच्या नेत्यांनी शरद पवारांना दिलेला शब्द पाळला नव्हता. याचीच मी या बैठकीमध्ये आठवण करुन दिली. यावेळी तरी आपण आपल्यातील एकी दाखवूया असे आवाहन मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केले, असे अजित पवार यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे माझ्याकडे कोणतेही खाते नसल्यामुळे मी गृह खात्याचा विषय काढून सोलापूरमधील स्थानिक नेत्यांना दम भरण्याचा विषयच येत नाही. मी केवळ सर्व नेत्यांना एकत्र राहण्याचे आवाहन केले, असे अजित पवार या प्रकरणावर पडदा टाकताना म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.