पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच राज्यभरातून नोकरीसाठी शहरात येणा-या युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या गुजरात हिताच्या धोरणामुळे युवकांचे भविष्य संकटात सापडले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री युवकांचे प्रश्न समजून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे हे प्रश्न समजून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसोबत चर्चा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली.
इम्रान शेख म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉनच्या पाठोपाठ टाटा एअरबस हे रोजगारात निर्मितीला भरीव योगदान देणारे प्रकल्प भाजप-शिंदे सरकारने मोदी प्रेमापोटी गुजरातच्या घशात घातले. यासह पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील छोटे-मोठे असंख्य उद्योग राज्य सरकारच्या कुचकामी धोरणामुळे राज्याबाहेर स्थलांतरित झाले. एकापाठोपाठ एक असे उद्योग बाहेर जात असल्याने रोजगार निर्मितीचे स्त्रोत बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पिंपरी-चिंचवड हे नोकरी व व्यवसाय करणाऱ्या नव युवकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मोठे उद्योग राज्याबाहेर स्थलांतर होत असल्याने त्यावर अवलंबून असलेले लघु उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर, काही उद्योग बंद पडले आहेत. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी युवकांना राज्य सरकारकडून प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
युवकांचे प्रश्न ऐकून त्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार खुद्द शहरात येणार आहेत. खास युवकांच्या प्रश्नांवर सल्लामसलत घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष इम्रान शेख यांनी पुढाकार घेतला आहे.
मोठे उद्योग राज्याबाहेर जात असल्यामुळे आपल्या शहरातील युवक व नोकरी, व्यवसाय करण्यासाठी शहरात येणा-या युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर मार्ग काढण्याची राज्यातील सरकारची अजिबात तयारी दिसत नाही. युवकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारकडून झटकण्यात येत आहे. त्यामुळे आता अजित पवारच युवकांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नोव्हेंबर अखेर शहरात येणार आहेत.
इम्रान शेख, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस