Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे. संपूर्ण बारामती सुन्न झाली असून मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. अनेक राजकीय मंडळींना अश्रु अनावर झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली असून, अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अनेक ठिकाणी गावे, मार्केट यार्ड बाजारपेठा बंद असून शिक्षण संस्था आणि शाळा महाविद्यालय बंद आहेत. यासोबतच अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बारामती बंद करण्यात आली आहे. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला आहे. ही बातमी वाचा…. Nitin Gadkari : “संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी ” ; अजित पवारांच्या निधनाने नितीन गडकरीही हळहळले काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात भावूक : बाळासाहेब थोरात यांनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “कुशल प्रशासक आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम केले, त्यांच्या जाण्याने एक उमदा नेता आपण गमावलेला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली”. “महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण दिवस” -देवेंद्र फडणवीस आज सकाळी अत्यंत दुःखद घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अजित पवार यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती. अजित पवार हे संघर्ष करणारे नेते होते. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी कठीण दिवस आहे. अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात. ही बातमी वाचा : Ajit Pawar : शाळा आणि बाजारपेठा बंद.! अजित दादांच्या निधनानंतर महाराष्ट्रात लॉक डाऊन सारखी परिस्थिती, पुणे शहरात देखील शोककळा