बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीच्या मैदानात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याविषयी बारामती सह संपूर्ण राज्याला उत्सुकता होती. अखेर अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या नावावर शरद पवार यांनी शिक्कामोर्तब करत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. लोकसभेनंतर युगेंद्र पवार यांनी राजकारणात सक्रिय होत चुलते अजित पवार यांना आव्हान दिले आहे.
शरद पवार यांच्या पाठिंब्याने ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. गावभेट दौरे स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून त्यांनी बारामतीत झंजावात सुरू ठेवला आहे. वेगवेगळ्या कडांच्या माध्यमातून ते मतदारांशी गेले अनेक महिने संवाद साधत आहेत. असे असले तरी देखील बालेकिल्ल्यात विधानसभेसाठी अजित पवार यांचा धबधबा कायम आहे.
बारामतीचे सहा वेळा प्रतिनिधित्व करत अजित पवार यांनी सातव्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विकासाची गंगा त्यांनी बारामतीत आणली आहे. बारामती विकासाचा पॅटर्न म्हणून राज्यातच नव्हे देशात ओळखले जाते. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत अजित पवार यांचे पारडे जड राहिले आहे. यंदा मात्र पवार विरुद्ध पवार लढाई होत असल्याने वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार ठामपणे उभे आहेत. बारामतीच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांचा पराभव करणे एवढे सोपे नाही असा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र ज्या विकासाच्या जोरावर अजित पवार बारामती वर्चस्व गाजवत आहेत त्या विकासाच्या पाठीमागे शरद पवार हेच आहेत असे युगेंद्र पवार मतदारांना सांगताना कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. शरद पवार हे देखील बारामती विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे बारामतीतील काका विरुद्ध पुतण्याच्या हाय व्होल्टेज लढाईकडे राज्याचे लक्ष असेल.