मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज मुंबईत राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सत्कार करण्यात आला. ‘या सर्व आमदारांचे मी अभिनंदन करतो आणि हे सर्व आमदार सक्षमपणे आणि ताकदीने विधिमंडळात काम करतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांना जनतेचा पाठिंबा लाभला आहे. जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास हे सर्व आमदार सार्थ ठरवतील.
या निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक तरूण चेहऱ्यांना संधी दिली. जनतेने देखील मोठ्या अपेक्षांसह या तरूणांना निवडून दिलेले आहे. या युवा आमदारांना मोलाची भूमिका बजावायची आहे. त्यामुळेच विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी युवा आमदारांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असल्याचे पाटील म्हणाले.