Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमान अपघातातील अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar)जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये निर्माण झालेल्या पोकळीमुळे दोन्ही गट (अजित पवार गट आणि शरद पवार गट) एकत्र येण्याची चर्चा जोर धरली आहे. अजितदादांची तशी इच्छा होती का? हे प्रश्न कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. याबाबत पवार कुटुंबीयांचे जवळचे मित्र आणि शरद पवारांचे दीर्घकाळचे स्नेही विठ्ठल मणियार यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. अजित पवारांची एकत्र येण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर साधारण २ ते ३ महिन्यांनी अजित पवार स्वतः विठ्ठल मणियार यांच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी भावनिक होऊन म्हटले होते, “काका, आपण सर्वांनी एकत्र राहणे मला गरजेचे वाटते. साहेबांनी (शरद पवार) माझ्यासोबत आणि पक्षासोबत यावे, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे.” अजित पवार यांनी मणियार यांना विनंती केली की, “तुम्ही साहेबांचे जवळचे मित्र आहात, त्यामुळे तुम्ही हा निरोप साहेबांना द्यावा.” Ajit And Sharad Pawar त्यांनी सुचवले की, मणियार आणि अंकुश काकडे या दोघांनी मिळून शरद पवार यांच्याशी चर्चा करावी.मणियार यांनी हा निरोप शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवला. शरद पवार यांनी तो शांतपणे ऐकून घेतला, अशी माहिती मणियार यांनी दिली. अजित पवार हे एकत्र येण्यासाठी गंभीर होते आणि त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अपूर्ण राहिलेले स्वप्न महापालिका निवडणुकीच्या काळात दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली होती. जयंत पाटील यांनीही तसे संकेत दिले होते. अनेक ठिकाणी दोन्ही गटांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचे निर्णय घेतले होते. मात्र, नियतीने वेगळे ठरवले आणि ही चर्चा पुढे सरकू शकली नाही, असे मणियार यांनी सांगितले. अजित पवारांच्या निधनाने ही प्रक्रिया अपूर्ण राहिली. शरद पवारांनी स्वतःला कसे सावरले अजित पवारांचा अपघाती निधन हा शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबाला आणि पक्षाला मोठा धक्का होता. घरातील कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवारांना प्रचंड दुःख झाले. ते आतून पूर्णपणे कोलमडले होते, मात्र चेहऱ्यावर कधीही तसे भाव दाखवले नाहीत. काही तासांनंतर त्यांनी स्वतःला सावरले. “जे घडून गेले ते बदलता येणार नाही, अजितदादांना परत आणता येणार नाही,” हे त्यांनी स्वीकारले. कुटुंबाला या धक्क्यातून बाहेर काढणे ही त्यांची पहिली प्राथमिकता होती. “मी जर ढासळलो तर अजित पवारांची मुले आणि पत्नी यांचे काय होईल,” असा विचार करून त्यांनी दुःख गिळले, असे मणियार यांनी सांगितले. विठ्ठल मणियार कोण आहेत? विठ्ठल मणियार हे फक्त शरद पवारांचे मित्र नाहीत, तर पवार कुटुंबाचा एक भाग मानले जातात. ६० वर्षांहून अधिक काळ राजकारणाच्या केंद्रस्थानी वावरत असूनही त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही किंवा कोणतेही सरकारी पद स्वीकारले नाही. ते बारामतीतील विद्या प्रतिष्ठान चे ट्रस्टी आहेत. कठीण काळात ते नेहमी पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले, हे त्यांच्या निकटतेचे प्रतीक आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता अद्याप चर्चेत आहे, पण अजितदादांची इच्छा आणि प्रयत्न हे स्पष्ट झाले आहेत. पवार कुटुंब आणि पक्षाच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.