ठाणे : प्रा.डॉ.प्रदीप ढवळ लिखित ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी अजित पवार यांनी भाषणादरम्यान आपल्या मनातील खंत शिंदे-फडणवीसांसमोर बोलून दाखवली. “देवेंद्र फडणवीस यांनी जर मला मुख्यमंत्री करणार असे बोलले असते तर संपूर्ण पक्षच घेऊन आलो असतो, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.
काय म्हणाले अजित पवार?
ठाण्याच्या या ऐतिहासिक नगरीत खुप काही घडलंय. सामान्य नागरीक ते मुख्यमंत्री असा प्रवास एकनाथराव शिंदे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांची टर्म 99 साली सुरु झाली. एकनाथ शिंदेंची कारकिर्द 2004 ची आहे. मी यांच्या आधीचा आहे, हे सर्व पुढे गेले मी तिथेच राहिलोय. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हणालो मला जर मुख्यमंत्री करणार असं बोलले असते तर संपुर्ण पार्टीच घेवून आलो असतो. मला जर संधी दिली असती तर मी पूर्ण पार्टी आणली असतीय त्यांनी तर फक्त आमदराच आणले. आता वेळ निघून गेली. माझे आणि फडणवीस-शिंदे यांचे संबंध आधीपासूनच चांगले आहेत.
कोण ढेकून म्हणतोय, कोणी काय म्हणतोय ही महाराष्ट्राची परंपरा नाही. सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना मी विधिमंडळात गेलो. बरेच मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा लोकांच्या गरांड्यात राहणारे मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे आहेत. वसंतराव नाईकांपासून ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सर्वांत जास्त सह्या करणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे. मला सुद्धा शेतीची आवड आहे. पहाटे 6 वाजता शेतात जातो. पण एकनाथराव यांच्या एवढे फॅालोअर माझे नसल्याने माझे फोटो येत नाहीत. मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे सहाला शेतात जातो. परंतु, मीडिया आमची फॅन नसल्याने आमचे फोटो, व्हिडीओ येत नाही असे अजित पवार म्हणाले.