Medical College Name : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालय तसेच मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून यासंदर्भातील अधिसूचना आज (ता. २) जारी करण्यात आली. यापूर्वीप्रमाणे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ हे नाव कायम राहणार आहे. मात्र, या महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयाचे नामकरण ‘स्व. अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालय’ असे करण्यात येणार आहे. तसेच मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचेही ‘स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही संस्थांच्या उभारणीत अजित पवार यांचे मोलाचे योगदान असल्याचे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. संकल्पनेपासून प्रत्यक्ष उभारणीपर्यंत त्यांनी वारंवार भेटी देऊन सूचना केल्या होत्या. या प्रकल्पांमुळे केवळ बारामतीच नव्हे, तर पुणे, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय दरात तपासण्या, शस्त्रक्रिया तसेच सीटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आदेशात असेही नमूद करण्यात आले आहे की, उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री म्हणून कार्यरत असताना अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले. जिल्हास्तरीय वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करणे, नवीन वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालये सुरू करणे, आधुनिक उपकरणांची उपलब्धता वाढविणे आणि ग्रामीण भागात तृतीयस्तरीय आरोग्यसेवा विस्तारण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे बारामती परिसरातील आरोग्य आणि शैक्षणिक विकासाला गती मिळाल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.