पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदार संघामधून राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.31) नाना काटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. चर्चेनंतरही उमेदवारी अर्ज माघारी न घेण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे काटे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजपच्या वाट्याला चिंचवड विधानसभा मतदार संघ आला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले नाना काटे हा मतदारसंघ भाजपला देण्यास विरोध करत होते. अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. नाना काटे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवक असल्याने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होत आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज नाना काटे यांच्याशी चर्चा राजकीय वातावरणात चर्चेचा विषय बनली आहे. नाना काटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून बंडखोरीमुळे महायुतीच्या मतात विभागणी होऊ शकते, त्यामुळे स्वतः अजित पवार बोलले तरच नाना काटे ऐकतील असे सांगितले जात होते. आज अजित पवार यांनी नाना काटे यांच्या निवासस्थानी भेट देत नाना काटे यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, नाना काटे हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. नाना काटे यांनी माध्ममांशी बोलताना सांगितले की, अजित पवार यांची ही सदिच्छा भेट होती. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी शहराबरोबरच मतदार संघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याबाबत कोणतीही चर्चा केली नसल्याचे काटे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे नाना काटे यांनी सांगितले.