“बहुधा मुख्यमंत्र्यांना घर न सोडण्याचीही सूचना अजित पवारांनीच दिली असावी”;भाजपचा खोचक टोला

मुंबई :  कोकणात मागील दोन तीन दिवसापासून पावसाने  थैमान घातले  असून  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत आपापला जिल्हा न सोडण्याच्या सूचना संबंधित जिल्ह्याचे मंत्री आणि आमदारांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये  टीका करण्यात आली आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये अजित पवारांचे नाव घेऊन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. अतुल भातखळकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा सोडू नका, अशी सूचना मंत्री आणि आमदारांना अजित पवारांनी दिली आहे म्हणे. बहुधा मुख्यमंत्र्यांना घर न सोडण्याचीही सूचना अजित पवारांनीच दिली असावी”! असे म्हटले आहे.

करोना काळात देखील मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या मुद्द्याचे  भांडवल करून विरोधकांनी रान पेटवले  होते. त्याच मुद्द्याला धरून आता पावसाच्या संकटासमोर मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याचा टोला विरोधकांनी लगावला आहे.

शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, त्या त्या जिल्ह्यातील मंत्रिमंडळातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.