नागपूर: सभागृहात सदस्यांना नेमून दिलेल्या जागेवरून न बोलणाऱ्या शिवसेनेची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी गोची केली. अजित पवार यांनी विधानसभा कामकाजाच्या नियमावर बोट ठेवून सदस्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागेवरूनच बोलले पाहिजे, असे सांगितले. अजित पवारांच्या या सल्ल्यामुळे भाजपाने त्यांच्या भूमिकेचे स्वागत करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.
विधानसभेत शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवत होते. देसाई हे त्यांना नेमूण दिलेल्या जागे ऐवजी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागेवरून अहवाल मांडत होते. याला भाजपाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या आक्षेपांकडे दुर्लक्ष केले. मात्र, देसाई यांचे अहवाल मांडण्याचे काम संपल्यानंतर अजित पवार उभे राहिले. त्यांनी विधानसभा कामकाजाच्या नियमाकडे लक्ष वेधले. मंत्री असो किंवा विरोधी पक्षनेता असो… सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागेवर बसूनच बोलले पाहिजे. सदस्यांनी ठरवून दिलेल्या जागेवरूनच बोलायचे असते आणि ही पद्धत पाळली गेली पाहिजे, असे पवार म्हणाले. पवारांच्या या भूमिकेचे भाजपाच्या सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.