पुणे – “आज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, यापुढे अर्थखाते टिकेल की नाही टिकेल, सांगता येत नाही,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे.
यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांच्या सोबत झालेल्या बंददाराआड चर्चेसाठी अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
“मला या विषयावर काही बोलायचे नाही. मला विकासाबद्दल विचारा. मी विकासासाठी बैठका घेतोय. माझे ध्येय फक्त विकास एके विकास एवढाच आहे,’ असे सहकार संस्था आणि कारखान्यांसंदर्भातील बारामतीमधील एका कार्यक्रमात अजित बोलत होते.
उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री असताना अनेक योजनांच्या फाइल्स आमच्यापुढे यायच्या. त्यात कोणत्या गावांची नावे आहेत, हे बघायचे, बारामतीचे नाव नसेल,
तर टाकायचे आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला 42 कोटी रूपयांचे मॅग्नेटचे काम मिळाले, असा किस्साही अजित पवार यांनी यावेळी सांगितला.
शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यांनी अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
त्यावर बोलताना, प्रत्येकाला तक्रार करण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार आहे. कायद्याच्या नियमांच्या चौकटीत बसवून अध्यक्ष त्यावर निर्णय देतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
‘राष्ट्रवादीचा अस्त होत आहे…’ ; चंद्रशेखर बावनकुळे
“अजित पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सूर्योदय झाला होता. परंतु आता अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्याने अनेकजण अस्वस्थ आहेत, कारण ते राष्ट्रवादीमध्ये नसल्याने उर्वरीत पक्षाचा सूर्यास्त झालेला आहे, अस्त होत आलेला आहे.
त्यातूनच राहिलेल्या राष्ट्रवादीमधून अजितदादांना डावलले जात असल्याची भाषा सुरू झाली आहे,’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरमध्ये बोलताना केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमच्याकडे आणखी 10 आमदारांच्या प्रवेशाची यादी तयार आहे, असाही दावा केला. मात्र हे आमदार कोणत्या पक्षाचे आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.