मुंबई – अजित पवार आमच्या ग्रुपचे कॅप्टन असून, ते मध्येच अशी शस्त्रे टाकू शकत नाहीत, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर भुजबळ बोलत होते. अजित पवारांच्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली होती.
भुजबळ पुढे म्हणाले की, अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते निश्चितच निवडणूक लढवतील. त्यांना मध्येच अशी शस्त्रे टाकता येणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत जे झाले ती व्यथा त्यांनी मांडली आहे. मी स्वतः 78 वर्षांचा आहे. मग मला ते लढायला का सांगतात? वय आहे ते तो काही मुद्दा नाही.
भुजबळ यांनी यावेळी शिवसेनेने अर्थखात्यावर व्यक्त केलेल्या नाराजीवरही भाष्य केले. ते म्हणाले, सरकार सर्वांचे पैसे देईल. पण त्यासाठी भांडवल लागते. हे भांडवल जसजसे जमा होईल तसतसे दिले जाईल. उशीर होणे हे काही नवे नाही.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही 3-3 वर्षे उशीर होत होता. प्राधान्य कशाला हे या प्रकरणी ठरवले जाते. त्यामुळे महायुतीच्या तिन्ही घटकांना आगामी निवडणुकीत चांगले यश मिळवायचे असेल तर त्यांनी असे एकमेकांवर विधाने करू नये. विरोधकांना खाद्य पुरवू नये.