सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची धडपड
वाघळवाडी – बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सहकारी साखर कारखान्याची लवकरच निवडणूक लागणार आहे. यामध्ये आपल्याला संधी मिळावी, यासाठी अनेक राजकीय कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. अजित पवार यांचे आपल्याकडे लक्ष राहावे, म्हणून इच्छुक कार्यकर्ते विविध क्लृप्त्या लढवून त्यांच्यासमोर हुजरेगिरी करीत आहेत, अशी चर्चा सोमेश्वर कार्यक्षेत्रात रंगली आहे.
सोमेश्वर कारखान्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा विविध संस्थांमध्ये पदे भोगलेल्यांना सुद्धा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची गोडी लागली आहे. सोमेश्वर कारखान्याचे सर्व दोर अजित पवार यांच्या हातात असल्याने त्यांच्यासमोर आपली छाप पडावी म्हणून इच्छुकांनी धावपळ दिसून येत आहे. निंबूत, करंजेपूल, वडगाव निंबाळकर, मोरगाव, नीरा-कोळविहीरे (पुरंदर), वीर, फलटण व खंडाळा या तालुक्यामधील काही भाग. त्यामधील राजकीय कार्यकर्ते छोटे- मोठे नेत्यांमध्ये चढाओढ दिसत आहे.
घराणेशाही केव्हा संपणार ?
राजकारणात नियमित घराणेशाही हा कळीचा मुद्दा आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते पदांपासून वंचित राहतात. केवळ एकाच घराण्यातील भाऊबंदकी, नातेवाइकांनाच पदे मिळत आहेत, असाच प्रकार सोमेश्वर कारखान्याच्या भागात दिसत आहे. सोमेश्वर कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे का, घराणेशाहीची परंपरा जोपासणारा आहे, असा सवाल सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
बिनविरोध होण्याची चिन्हे?
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. कारण की बहुतांशी विरोधकांनी सत्तेच्या पदाच्या लालसेपोटी राष्ट्रवादीशी जवळीक साधल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये कमी कष्टात पद मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. कारखान्याचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्यासमोर आपला एक वेगळा ठसा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना स्वयंघोषित नेते दिसत आहेत.
निंबूतमधील इच्छुकांची धडपड उघड
महाशिवरात्रीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे श्रीक्षेत्र सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा निंबूत गटातील एक इच्छुक पवार यांच्यासमोर पुढे पुढे करीत होता. केवळ ‘सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पवारांचा आपल्या डोक्यावर हात राहावा, यासाठी हा इच्छुक थेट चापलुसी करीत असल्याची चर्चा परिसरात रंगली होती.
सोमेश्वरमध्ये शेतकऱ्यांसाठी नेता आहे का नाही?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये नेहमीच विकासाचे वेगवेगळे निर्णय घेतले जातात. त्यामुळे या निर्णयामध्ये खऱ्या अर्थाने सभासदांचे हित आहे. त्यामुळे सहकार वाढेल का? सभासद पुढे जाईल का, सभासद शेतकऱ्यांची बाजू उचलून धरणारा व सत्तेचा हव्यास न बाळगणारा असा तरुण पिढीतला शेतकरी नेता उदयास येणार का, हे आता पाहावे लागणार आहे.