Political News : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील तब्बल १५ ते २० आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार गटातील काही नेत्यांनी विलिनीकरणाला विरोध दर्शवला असला, तरी त्याच गटातील एका मंत्र्याने शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत दोन्ही गटांच्या एकत्रीकरणावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील सततच्या अंतर्गत वादांमुळे काही आमदार अस्वस्थ आहेत. मतदारसंघातील जनसंपर्क आणि राजकीय प्रभाव कमी होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी ते पर्याय शोधत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काही आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात जाण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बारामती पोटनिवडणुकीच्या तोंडावर या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अजित पवार गटातील आमदार प्रत्यक्षात शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.