गडचिरोली : राज्यात सध्या आरक्षणचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मराठा, ओबीसी आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. राज्य सरकार देखील सकारात्मक पावले टाकत असताना अजित पवार गटाकडून जोरदार विरोध दर्शवला जात आहे. त्यामुळे महायुतीमधील धुसफूस समोर येताना दिसत आहे.
अजित पवारांच्या आमदाराने सरकारला दिला इशारा
धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अशी जाहीर भूमिका मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतली आहे. संपूर्ण आदिवासी समाजामध्ये आरक्षणविषयावरून रोष आहे. सरकारने चुकीचे पाऊल टाकू नये. सरकारने जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर मी मंत्रिमंडळात राहणार नाही, असे धर्मरावबाबा आत्राम म्हणाले आहेत.
नरहरी झिरवाळ यांनी देखील केला विरोध
धनगर समाजाला आरक्षण द्यावे यावर आमचे दुमत नाही. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असे आमचेही मत आहे फक्त अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, असे मत स्पष्ट व्यक्त करीत विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी सरकारच्या निर्णयांना कडाडून विरोध केला आहे.