कासारसाई धरणाच्या पाण्यात मधोमध अडकले अजित पवार

मत्स्यव्यवसायाची पाहणी करताना घडला प्रकार

चांदखेड (प्रतिनिधी) – कासारसाई धरणामध्ये मत्स्यव्यवसाय प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि. 8) धरणाच्या पाण्यात मधोमध अडकून पडले. उपमुख्यमंत्री पवार ज्या तराफ्यात बसले होते तो तराफा अधिकच्या वजनाने बंद पडला. नंतर दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने पवारांनी प्रकल्पाची पाहणी केली.

कासारसाई धरणामध्ये वेदिका फार्मच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने मत्स्यव्यवसाय केला जातो. त्याची पाहणी करण्यासाठी अजित पवार शुक्रवारी पहाटे सहा वाजता कासारसाई धरणावर आले होते.

मत्स्यव्यवसायासाठी धरणाच्या मध्यभागी प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे. तेथे जाण्यासाठी तराफा किंवा बोटीने जावे लागते. परंतु संबंधित मालकाने तराफ्याने जाण्याचे नियोजन केले. तराफ्यामध्ये अधिकची गर्दी करू नका म्हणून अजित पवारांनी तंबी दिली होती. परंतु पवार तराफ्यावर बसले आणि त्यानंतर मागून अधिकच्या काहींनी गर्दी केली.

परिणामी जास्त गर्दीमुळे तराफ्याचे इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरू करण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले परंतु ते सुरू होऊ शकले नाही. शेवटी लगतची बोट घेऊन त्यातून पुढचा प्रवास केला. तसेच, त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.