भंडारा रुग्णालयातील अग्नितांडवावर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून त्यात १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेवर सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मृत बालकांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

रुग्णालयात बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.