अजित पवारांनी केली पार्थ यांची पाठराखण

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना सार्वजनिकरित्या फटकारल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे पवार कुटुंबियांत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली आहे.

या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. मात्र, अजित पवार यांनी पार्थ यांची पाठराखण केल्याची माहिती मिळत आहे. तो अजून लहान आहे, हळूहळू तयार होईल. मात्र त्याला असे सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावणं योग्य नाही, अशा शब्दांत शरद पवार यांच्यासमोर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडताना या प्रकरणाची चौकशी करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचं सांगितलं आहे.

असं असताना देखील महाविकास आघाडी सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्याने साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही पार्थ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या भूमिकेशी विरोधाभास असणारी भूमिका मांडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.