मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर त्यांना कोरोना बाधा झाल्याचे जाहीर केले. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल होत असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्वाचे नेते असलेल्या अजित पवार यांना कोरोना बाधा झाल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते ते लवकरात-लवकर ठणठणीत बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.
अशातच आता अजित पवार यांच्या भगिनी व खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासाठी एक भावनिक ट्विट केलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर अजित पवार यांनी आपल्याला कोरोना बाधा झाल्याची माहिती देणारे ट्विट रिट्विट करत, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.दादा लढवय्ये आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन लवकरच सर्वांच्या सोबत येतील. दादा, लवकर बरे व्हा” असा संदेश दिला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना बाधा झाल्याचे वृत्त होते. मात्र आज स्वतः अजित पवार यांनी आपल्या ट्विटर खात्यावर याबाबतची माहिती दिल्याने त्यांना कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत माहिती देताना जैत पवार यांनी, “माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन.” असा विश्वास व्यक्त केला.