जिल्हानिहाय यादी जाहीर
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केल्यानंतर आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद मिळालेले आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीचेही पालकमंत्री पद मिळालेले आहे. तर कोकणातील दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळाले आहे. यात सिंधुदुर्गाचे पालकमंत्रिपद उदय सामंत, तर रत्नागिरीचे पालकमंत्रिपद अनिल परब यांना देण्यात आले आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे कॉंग्रेसच्या वाट्याला आले आहे. यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांना गोंदियाचे पालकमंत्री पद मिळालेले आहे. तर इतर मागासवर्ग सामाजिक मंत्री विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर, राज्यमंत्री सतेज पाटील यांना भंडारा, उर्जा मंत्री नितीन राऊत यांना नागपूर आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांना वर्ध्याचे पालकमंत्री पद मिळालेले आहे.
पुण्यातील प्रकल्पांना गती मिळणार
पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील रिंगरोड, भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्प, मेट्रो आदी महत्त्वाच्या प्रकल्पांस विविध विकास कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. पवार यांची प्रशासनावर पकड असून प्रशासनामध्ये त्यांचा दबदबा आहे. पवार यांनी बोलविलेल्या बैठकीला अधिकाऱ्यांना अभ्यास करूनच जावे लागते. या सर्व पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून सुस्तावलेले प्रशासन आता खऱ्या अर्थाने कामाला लागणार असल्याचे बोलले जात आहे.