पिंपरी – शिवसेना भाजपाच्या काळात लोकनियुक्त सदस्याला स्थान मिळत असताना राष्ट्रवादीच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच विश्वास दाखविला जात असल्याचे नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवित या पदाची सूत्रे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडेच सोपविला असून त्याबाबतचे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने जारी केले आहेत.
नगरविकास विभागाच्या आदेशामुळे प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची अध्यक्ष पदाची कारकीर्द संपुष्टात आली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खाडे यांची 6 सप्टेंबर 2018 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना जवळपास 16 महिन्यांचा कालावधी मिळाला. तत्पूर्वी 1995 साली राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर महामंडळाच्या वाटपामध्ये प्राधिकरण भाजपाच्या वाट्याला गेले होते. तत्कालीन वेळीही भाजपाकडून अगस्ती कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. भाजपाची सत्ता राज्यातून हद्दपार होवून कॉंग्रेस राष्ट्रवादीची सत्ता राज्यात आल्यानंतर 25 ऑक्टोंबर 2001 मध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते बाबासाहेब तापकीर यांची नियुक्ती करण्यात आली. 22 ऑक्टोंबर 2004 पर्यंत ते प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी होते.
2004 नंतर पुणे जिल्ह्याची सूत्रे अजित पवार यांच्या ताब्यात आल्यानंतर मात्र त्यांनी प्राधिकरणाचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालविण्यावर भर दिला. दिलीप बंड यांच्याकडे प्राधिकरणाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. यानंतर सलग 14 वर्षे प्राधिकरणावर प्रशासकीय राजवट राहिली. राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर खाडे यांची 2018 मध्ये प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाले.
प्राधिकरणावरील नियुक्तीही रद्द करून त्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्याकडे सोपविला आहे. राज्यातील सत्तापालटा नंतर स्थानिक राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यापैकी एखाद्याची वर्णी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी वर्णी लागेल, असे सांगितले जात होते. मात्र अजित पवारांनी इच्छुकांसह शहरातील इतरांवर विश्वास न दाखविता प्रशासकीय अधिकाऱ्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे.
नियुक्ती होणे अशक्यच?
राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे या पदावर आता लोकनियुक्त सदस्याची वर्णी लागणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच अजित पवारांनी यापूर्वीही प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच विश्वास दाखविल्याने आता पुढील पाच वर्षे प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा केवळ “गाजर’ म्हणूनच वापर होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्याच्या आडून अजित पवारच प्राधिकरणाचा गाडा हाकण्याची चर्चा शहरात रंगली आहे.
भाजपने केलेल्या महामंडळावरील नियुक्त्या महाविकास आघाडी अध्यक्ष पदावर मला सव्वा वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यातही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे काम करण्यावर मर्यादा आल्या. तथापि, 1972 ते 1984 या कालावधीत प्राधिकरणाला जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना 12.5 टक्के जमीन परतावा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 4 हजार 900 घरांच्या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. मोशी येथे खुल्या प्रदर्शन केंद्राचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाच्या दिशेन आहे.
– सदाशिव खाडे, मावळते अध्यक्ष, प्राधिकरण