अजित डोवाल यांना कॅबिनेट दर्जा

नवी दिल्ली- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना मोदी सरकारने या पदावर कायम ठेवतानाच त्यांना आता कॅबिनेटचा दर्जा दिला आहे. तशी अधिसूचना सरकारतर्फे आज जारी करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती विषयक समितीने त्यांच्या फेरनियुक्तीचा प्रस्ताव 31 मे पासून पुर्वलक्षी प्रभावाने मान्य केला आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळापर्यंत त्यांची ही नियुक्ती राहणार आहे.

मोदींची मुदत संपल्यानंतरच त्यांचीही या पदावरील नियुक्ती आपोआप संपुष्ठात येईल असे सरकारी आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यांना आता केंद्रीय मंत्र्यांचाही दर्जा देण्यात आल्याने डोवाल यांचे सरकार मधील वजन आणखीनच वाढले आहे. मोदी सरकारने त्यांची मे 2014 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. व त्यावेळी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता.

डोवाल हे भारतीय गुप्तचर यंत्रणेतील अत्यंत चाणाक्ष आणि कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेत 33 वर्ष काम केले आहे. ते 1968 च्या आयपीएस बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून ते जानेवारी 2005 मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर त्यांची नेहमीच महत्वाच्या कामगिरीवर नियुक्ती होत राहीली.

मोदी सरकारच्या काळात एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. चीन बरोबरच्या डोकलाम संघर्षातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी या आधी गुप्तचर अधिकारी म्हणून जम्मू काश्‍मीर आणि ईशान्य भारतात मोलाची कामगीरी केली होती. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 1999 मध्ये जे कंदहार विमान अपहरण प्रकरण घडले होते त्यावेळीही अपहरणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांचीच निवड करण्यात आली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.