नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष संपवण्याच्या दृष्टीने संभाव्य मध्यस्थीच्या प्रयत्नांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे रशियाला जाणार आहेत. या आठवड्यात रशियात होणाऱ्या ब्रिक्स गटाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते रशियाला जाणार आहेत. त्यावेळी रशिया-युक्रेन संघर्षाबाबत संबंधितांशी ते चर्चा करणार आहेत.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आप्रिकेचा समावेश असलेल्या ब्रिक्स गटाच्या बैठकीमध्ये रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्याच्या दृष्टीने चर्चा होणे अपेक्षित आहे. रशियामध्ये डोवाल हे रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी शांतता प्रस्थापनेविषयी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला आणि त्यानंतर रशियाला दिलेल्या भेटीनंतर डोवाल रशियाला जात आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये भारत आणि चीन मध्यस्थी करू शकतील, असे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर म्हणाल्या होत्या. तर इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी देखील भारत, चीन आणि ब्राझील हे या संघर्षात मध्यस्थी करू शकतील, असे सूचक वक्तव्य केले होते.
या पार्श्वभुमीवर मध्यस्थीची शक्यता तपासून बघण्यासाठी ब्राझील आणि चीनशी चर्चा होणे आवश्यक आहे. आपण या दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत आणि या देशांचे नेते, आणि आमच्या नेत्यांचे एकमेकांशी विश्वासाचे संबंध आहेत, ते खरोखरच मध्यस्थी करण्यास स्वारस्य दाखवतील आणि मदतीचा हात पुढे करतील, याबाबत आपल्याला शंका नाही, असे डोवाल यांनी म्हटले आहे.