अजितदादांचे उत्तर…आपली उंची बघून तरी बोलावं; विनाशकाले विपरीत बुद्धी…

पुणे- “राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. समाजात ज्यांना कवडीचीही किंमत नाही ते खालच्या पातळीवर जाऊन बडबड करत आहेत. वक्तव्य करणाऱ्यांनी किमान आपली उंची बघून तरी बोलावं,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.

 

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या प्रचारार्थ आयोजित मेळ्याव्यामध्ये ते बोलत होते. पवार म्हणाले, “ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही त्यांनी काय टीका करावी? गेल्या 60 वर्षांपासून शरद पवार राजकारण, समाजकारण करत आहेत. महाराष्ट्राची बारकाईने जाण असणारा नेता, दिल्लीत त्यांच्या शब्दाला मान आहे, हे अनेकदा आपण पाहिले आहे.

 

यांची सत्ता असताना सहकाराबाबत पंतप्रधानांशी बोलण्यासाठी पवार आमच्याबरोबर असतील, तर प्रश्न लवकर मार्गी लागेल, असे म्हणारे आज पवारांवर टीका करतात. याला विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणावे लागेल.’

 

राज्याला निधी मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सगळी सोंगं करता येतात, पण पैशांचं सोंग करता येत नसल्याने प्रत्येक पाउल विचार करुन उचलण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी आपल्या विचाराचे सरकार स्थापन झाले. मात्र, करोनामुळे विकास कामांना खिळ बसल्याचे पवार यांनी सांगितले.

 

करोना मानगुटीवर बसण्याची शक्यता

दिवाळीत रस्त्यांवर इतकी गर्दी होती की, या गर्दीत करोना चेंगरून मेला? असे एकायला मिळाले. पुण्यातील बाजीराव रस्त्यावर तर भयानक गर्दी झाली होती. एकदा करोना झाल्यावर परत होणार नाही असे अनेक जणांना वाटते तो दावा चुकीचा आहे. काळजी घेतली नाही तर करोना दुसऱ्यांदासुद्धा मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असेही अजित पवार यांनी आवाहन केले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.