मेलबर्न – कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतक व त्याने रवींद्र जडेजाच्या साथीत केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीवर रविवारी दुसऱ्याच दिवशी पकड घेतली आहे. दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा भारताने आपल्या पहिल्या डावात 5 बाद 277 धावा केल्या असून आता संघाकडे 82 धावांची आघाडी आहे. कर्णधार रहाणे 104 धावांवर तर, रविंद्र जडेजा 40 धावांवर खेळत आहेत.
दरम्यान, बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दोन शतके फटकावण्याचा मान रहाणेने मिळवला. 2014 साली झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रहाणेने 147 धावांची खेळी केली होती. 1999 मध्ये बॉक्सिंग डे कसोटीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतकी खेळी केली होती.वीरेंद्र सेहवागने 2003, विराट कोहलीने 2014 तर, पुजाराने 2018 साली बॉक्सिंग डे कसोटीत शतक फटकावले होते.
मेलबर्नवर सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या खेळाडूंत रहाणे हा विनू मंकड यांच्यासह पहिल्या क्रमांकावर आहे. मेलबर्नवर रहाणेचं हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी विक्रमादीत्य सुनील गावसकर, कोहली, पुजारा, सेहवाग, सचिन व गुंडाप्पा विश्वनाथ यांनी या मैदानावर शतकी खेळी केली आहे. कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात शतक साकार करणारा रहाणे पाचवा खेळाडू ठरला आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक शतक झळकावणारा रहाणे पहिलाच फलंदाज ठरला आहे. मेलबर्नवरचे शतक रहाणेचे या स्पर्धेतील तिसरे शतक ठरले.